पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पुढचं आव्हान
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान काय म्हणाले?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पाचव्यांदा देशभरातील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. आतापर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधान मोदी यांनी पुढची रणनीती आणि आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व राज्य मिळून काम करत आहेत. कॅबिनेट सचिव राज्यांच्या सचिवांशी सतत संपर्कात आहेत. भारत या संकटातून वाचवण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे. राज्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे.
पुढे काय करायचे?
पुढे काय करावे याबाबतही पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केले. अधिक फोकस ठेवा आणि सक्रियता वाढवा, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. संतुलित रणनीती आखून पुढे जायला हवे. पुढे काय आव्हानं आहेत आणि त्यातून मार्ग कसा काढायचा यावर काम करा, असे पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. सर्वांनी आर्थिक विषयावर सूचना करा, असंही त्यांनी सांगितले.
दो गज दूरी ढिली होऊ देऊ नका. डिस्टसिंग पाळलं नाही तर संकट वाढेल, असा इशाराही पंतप्रधानांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनंतर पुढची दिशा ठरवली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
आपण लॉकडाऊन कसं लागू करणार हा मोठा विषय होता. त्यात आपणासर्वांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. आमचा प्रयत्न होता की जो आहे तिथेच थांबावा, पण माणसाचं मन आहे आणि त्यामुळे आम्हाला काही निर्णय बदलावे लागले.
पुढे हे संकट महत्वाचे
पंतप्रधान मोदी यांनी पुढचा धोकाही मुख्यमंत्र्यांना सांगितला. कोरोनाचं हे संकट गावांपर्यंत पोहचू द्यायचं नाही हे आता आव्हान आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
गृहमंत्री शाह यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
आरोग्य सेतू अँप कोरोना व्हायरसला ट्रॅक करण्यात आणि कोरोनाशी लढण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे हे अँप लोकांपर्यंत पोहचवा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. प्रवासी श्रमिकांना घरी परतण्यासाठी आम्ही व्यवस्था केली आहे. ट्रेन चालवण्याची व्यवस्था केली आहे. या संकटात राज्याराज्यातला समन्वयदेखिल महत्वाचा आहे, असं शाह यांनी सांगितलं.