PM Modi Security Breach : पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, राष्ट्रपतींकडून मोठी कारवाई होणार?
सुप्रीम कोर्टातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे
Pm Narendra Modi security breach: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind) यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि बुधवारी पंजाबमधील (Punjab) त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा उल्लंघनाची माहिती दिली. राष्ट्रपतींनी सुरक्षेतील गंभीर त्रुटीबद्दल चिंता व्यक्त केली. सुप्रीम कोर्टातही (Supreme Court) हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिवक्ता मनिंदर सिंग यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर ठेवत या घटनेचा अहवाल देण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पंजाब सरकारला देण्याची मागणी केली. न्यायालयाने याचिकेची प्रत पंजाब सरकारला (Punjab Government) देण्यास सांगितलं. उद्या म्हणजेच शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर पंजाब सरकारने आता याप्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार समितीमध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश असेल. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करेल, असं प्रवक्त्याने सांगितलं.
उपराष्ट्रपतींची पंतप्रधान मोदींशी चर्चा
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनीही पीएम मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपतींनी सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची अपेक्षा केली आहे, जेणेकरुन भविष्यात अशा त्रुटी पुन्हा घडू नयेत
राज्यपालांचीही घेणार भेट
पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज राजभवन इथे राज्यपालांची भेट घेणार आहे.
काय घडलं होतं पंजाबमध्ये
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील फिरोजपूरला भेट दिली. मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांना रस्तेमार्गे जावं लागलं. पण यावेळी हुसैनीवालापासून 30 किमी अंतरावर आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला. यामुळे पंतप्रधानांना जवळपास वीस मिनिटं एकाच ठिकाणी थांबावं लागलं. पंतप्रधानांचा ताफा ज्या ठिकाणी थांबला होता. तो अत्यंत असुरक्षित भाग मानला जातो.
तो भाग हेरॉईन तस्करांचा बालेकिल्ला मानला जातो, तसंच गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये याच भागात दहशतवादी घटना घडली होती.
फिरोजपूरमधली रॅली रद्द करावी लागली
सुरक्षेच्या कारणास्तव फिरोजपूरमधील पंतप्रधानांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यांचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला. केंद्राने या घटनेचा सविस्तर अहवाल पंजाब सरकारकडून मागवला आहे. भटिंडा विमानतळावर पंतप्रधानांनी पंजाब सरकारच्या अधिकार्यांना सुनावलं 'भटिंडा विमानतळापर्यंत मी जिवंत परत येऊ शकलो याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार.'