6400 कोटी रुपये अन् मोदींनी `मित्रा`बरोबर काढलेला सेल्फी! प्रचंड व्हायरल होतोय `हा` फोटो
PM Modi Selfie With His Friend: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्याच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट केला असून तो काही वेळात व्हायरल झाला आहे. 10 हजारांहून अधिक वेळा हा फोटो रिट्वीट करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
PM Modi Selfie With His Friend: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर होते. यावेळी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर' या विशेष सभेत बोलताना पंतप्रधानांनी अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर विकासाच्या नव्या उंचीवर पोहचल्याचं प्रतिपादन केलं. यावेळेस मोदींच्या राजकीय भाषणाबरोबरच त्यांनी 6400 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटनही केलं. या विकास प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल असं पंतप्रधान म्हणाले. येथील विकासाला प्राथमिकता असल्याचं मोदी म्हणाले. मोदींच्या या सभेतील घोषणा आणि भाषणांबरोबरच त्यांनी एका मित्राबरोबर काढलेला सेल्फी चांगलाच चर्चेत आहे.
मोदींनीच शेअर केला फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दौऱ्यामध्ये सरकारी योजनांच्या काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी नझीम नाझीर नावाच्या एका मद्य विक्रेत्याने पंतप्रधान मोदींबरोबर सेल्फी क्लिक करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. पंतप्रधानांनीही या तरुणाची इच्छा पूर्ण केली. मोदींनीच हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. "माझा मित्र नझीमसोबतचा हा कायम स्मरणात राहील असा सेल्फी. त्याच्या कमाने मी प्रभावित झालो आहे. जाहीर सभेत त्याने सेल्फीची विनंती केली आणि त्याला यानिमित्ताने भेटून मला आनंदही झाला. त्याच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा," अशी कॅफ्शन मोदींनी दिली आहे.
नक्की वाचा >> महिला दिनीच सरकारची खास भेट! मोदींनी केली घोषणा; होणार मोठा आर्थिक फायदा
काय करतो नझीम?
पुलवामा जिल्ह्यात राहणारा नझीम नाझीर हा मधमाश्या पालनाचा व्यवसाय करतो. मधमक्षिका पालन केंद्र चालवणाऱ्या नझीमने 100 तरुणांना रोजगार दिला आहे. मधुमक्षिका पालनामध्ये नझीम नाझीरने 'मधुर क्रांती' केल्याचा शेरा पंतप्रधान मोदींनी दिला. मोदींनी पोस्ट केलेला हा फोटो 10 हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आला आहे.
मोदींचा काँग्रेसवर निशाणा
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसवर निशाणा साधला. "अनुच्छेद 370 वरुन काँग्रेसने केवळ जम्मू-काश्मीरच्या लोकांचीच नाही तर संपूर्ण देशाची दीर्घकाळ दिशाभूल केली," असं मोदी म्हणाले. अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकास झाला आहे कारण आता हे राज्य मुक्तपणे श्वास घेत आहे, असंही मोदी म्हणाले. शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि पर्यटनाच्या संधींमधूनच जम्मू-काश्मीरला विकास साधता येईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा राज्य घटनेतील अनुच्छेद 370 रद्द करुन त्याची 2 केंद्रशासित प्रदेशांत रुपांतर केल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा होता.