नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेला सल्ला नरेंद्र मोदी यांनी विनम्रतेने मानावा, अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत. त्यामुळे मी आशा करतो की, पंतप्रधान मोदी विनम्रतेने हे सल्ले स्वीकारतील, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नरेंद्र मोदी सरेंडर मोदी आहेत', राहुल गांधींची बोचरी टीका


भारत-चीन संघर्षानंतर राहुल गांधी दररोज ट्विट करुन मोदी सरकारवर हल्ला चढवत आहेत. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांना निशस्त्र का पाठवले इथपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनला बहाल केला का, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे सध्या भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये कालच जुंपली आहे. 



काल राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख थेट Surender Modi असा केला होता. यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. राहुल गांधी यांचे हे ट्विट भारतीय सैन्य आणि जनतेचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशवासियांची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. 


'ज्यांनी स्वत:च्या पंतप्रधानांचा अध्यादेश फाडला ते मोदींचा आदर काय करणार'


काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काँग्रेससारख्या ऐतिहासिक पक्षाचे नेते पंतप्रधानांविषयी बोलताना अशाप्रकारची भाषा वापरतात, ही दुर्दैवी गोष्ट आहे. राहुल गांधी यांनी जिथे आपल्या पंतप्रधानांचा अध्यादेश फाडला होता, ते नरेंद्र मोदींचा आदर काय करणार, अशी बोचरी टीका यावेळी नड्डा यांनी केली होती.