राफेल घोटाळ्यामुळे मोदींना रात्री झोप लागत नाही- राहुल गांधी
आमचा विरोध उद्योजकांना नसून कंपूशाहीला आहे.
नवी दिल्ली: राफेल घोटाळ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रात्रीची झोप उडाली आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या युवा क्रांती यात्रा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राफेल घोटाळ्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. राहुल यांनी म्हटले की, मोदीजी मी समजू शकतो की, तुम्हाला झोप का लागत नाही? कारण झोपेत तुमच्या डोळ्यासमोर अनिल अंबानी, राफेल विमाने आणि भारतीय वायूदलातील शहीदांचा चेहरा येतो, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली. तसेच नरेंद्र मोदी आणि बड्या उद्योगपतींमधील संबंधांवरही त्यांनी भाष्य केले. तुमच्या स्वच्छता अभियानात केवळ शेतकरी, मजूर आणि गरिबांच्या हातातच झाडू का दिला जातो? हाच झाडू तुमचे मित्र असलेल्या उद्योजकांच्या हातात का देत नाही, असा सवाल राहुल यांनी विचारला. मात्र, त्याचवेळी राहुल यांनी काँग्रेस उद्योजकांच्या विरोधात नसल्याचेही स्पष्ट केले. आमचा विरोध उद्योजकांना नसून कंपूशाहीला आहे. मोदींनी गुणवत्ता नसलेल्या उद्योजकांना जनतेचा पैसा दिला, त्याला आमचा विरोध असल्याचे राहुल यांनी सांगितले.
भाजप आणि काँग्रेसमध्ये हाच फरक आहे. शेतकरी आणि लहान व्यापारी मिळून देशाचा विकास करतात, यावर आमच्या पक्षाचा विश्वास आहे. जर भारताला चीनच्या पुढे जायचे असेल तर ते केवळ लघू व मध्यम उद्योगांच्या बळावरच शक्य आहे. मात्र, मोदी सरकारने वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी करुन त्यांना मारले. या क्षेत्रातील रोजगार संपवले, अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली.
मोदी काँग्रेसमुक्त भारताची भाषा करतात. मात्र, आजच्या घडीला भाजपमधीलच अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये यायचे आहे. हीच काँग्रेसची खरी संघटनात्मक ताकद आहे. याच बळावर काँग्रेसने देशाला दुरदृष्टीने वाटचाल करायला शिकवले. ही गोष्ट भाजपला जमली नाही. कारण, देशाचे दीर्घकालीन धोरण ठरवण्यात सर्व संस्था, जाती आणि धर्माच्या लोकांचा सहभाग असतो. सरकारने त्यांचा आदर करणे गरजेचे असते, असे राहुल यांनी सांगितले.