कोरोनाबाबत लोकं गंभीर नाहीच, पंतप्रधान मोदींकडून नाराजी व्यक्त
कोरोनाची परिस्थिती लोकं गंभीरपणे का घेत नाहीत?
नवी दिल्ली : देशात कोरोना प्रकरणे सतत वाढत आहेत. देशातील दहापेक्षा जास्त राज्यात सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे, असे असूनही, लोक सतत घराबाहेर पडत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या स्थितीबद्दल पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, अजूनही बरेच लोक लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. कृपया स्वतःला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, सूचनांचे गंभीरपणे पालन करा. मी राज्य सरकारांना विनंती करतो की त्यांनी नियम व कायद्यांचं पालन करण्यासाठी सांगावं.'
कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असल्याने महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह देशातील 10 पेक्षा जास्त राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. परंतु सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी लोकं रस्त्यावर दिसू लागले. दिल्ली-नोएडा एक्सप्रेस वे सोमवारी सकाळी जाम झाला होता. तर मुंलुंड चेकनाक्यावर देखील गाड्यांची रांग लागली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्ती केली आहे.
लॉकडाउनपूर्वी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूमध्ये बरेच लोक रस्त्यावरही दिसले होते. संध्याकाळी ५ वाजता डॉक्टर, पोलीस, सरकारी कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थाळी व टाळ्या वाजवल्या गेल्या तेव्हा बर्याच शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि रॅली काढून टाळ्या वाजवल्या. यानंतर देशातील इतर राज्यांनीही लॉकडाउन लागू केले.
दिल्लीत कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोक एकाच ठिकाणी एकत्र येऊ नयेत म्हणून कलम 144 लागू केला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 400 च्या वर गेली आहे. तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.