नवी दिल्ली : Ram Mandir अयोध्येमध्ये बुधवारी एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही मान्यवरांच्या उपस्थिती राम जन्मभूमीवरील राम मंदिराच्या पायाभरणीचा सोहळा संपन्न झाला. साऱ्या देशातून यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला. पण, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र मोदींच्या या अयोध्या भेटीवर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळं राम मंदिराच्या शिलान्यासासाठी हजर राहत मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. हा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून, हिंदुत्त्वाचा विजय आहे अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 


'मोदींनी आज भावनिक झाल्याचं म्हटलं. आज मीसुद्धा भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो आहे, कारण त्या ठिकाणी जवळपास ४५० वर्षांसाठी मशिद उभी होती', असं ओवेसी म्हणाले. 
ओवेसी यांनी यावेळी काँग्रेसवरडी खोचक शब्दांत टीका केली. बाबरी मशिद पाडण्यासाठी काँग्रेसही तितकंच जबाबदार आहे, असं म्हणत या धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर आधारलेल्या पक्षांचा खरा चेहरा समोर आल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. ओवेसी यांच्या शब्दांतून नाराजी आणि संताप स्पष्टपणे झळकत होता. 




दरम्यान, एकिकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाचीच चर्चा सुरु असताना तिथं मुस्लिम लॉ बोर्डनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यातच ओवेसींची भूमिका अनेक मुद्द्यांना वाचा फोडून गेली. बाबरी मशिद होती आणि राहील, असं ट्विट करत त्यांनी मोजक्या शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली होती. तर, बाबरी मशिद होती आणि कायम राहील असं म्हणत अन्यायकारक, लाजिरवाणा, एकतर्फी निर्णयाद्वारे जमीनीवर होणारे पुनर्निमाण इतिहास बदलू शकत नाही. दु:खी होण्याची गरज नाही. कोणतीही स्थिती कायम राहत नाही, असं मुस्लिम लॉ बोर्डने म्हटलं होतं. त्यामुळं या प्रकरणाला वादाचं वळणही मिळाल्याचं स्पष्ट होत आहे.