नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौर्‍यावर जातील. खुद्द पीएम मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, रविवारी ते पश्चिम बंगालमधील हल्दिया आणि आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे भेट देतील आणि तेथे अनेक योजनांचा शुभारंभ करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन्ही राज्यात यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका पाहता भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे.  पश्चिम बंगालच्या दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की, उद्या संध्याकाळी मी पश्चिम बंगालच्या हल्दियात जाणार आहे. तेथील एका कार्यक्रमात मी बीपीसीएलने बांधलेले एलपीजी आयात टर्मिनल देशाला समर्पित करीन. पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रकल्पांतर्गत डोभी-दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाइपलाईन विभाग देशाला समर्पित करतील.”


आपल्या आसाम दौर्‍याविषयी बोलताना पीए मोदी म्हणाले की, "मी उद्या आसामच्या लोकांमध्ये आहे. सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे एका कार्यक्रमात, 'असम माला' कार्यक्रम सुरू केला जाईल, ज्यामुळे राज्याच्या रस्ते पायाभूत सुविधांना चालना मिळेल. हा उपक्रम आसामच्या आर्थिक प्रगतीमध्ये आणि कनेक्टिविटीमध्ये हातभार लावेल. ”


पीएम मोदी म्हणाले, “विश्वनाथ आणि चरैदेव येथील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या कामाची सुरुवात होणार आहे.  यामुळे आसामच्या आरोग्य रचनेला आणखी चालना मिळेल. गेल्या काही वर्षात राज्यात आरोग्य सेवांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. याचा फायदा फक्त आसामच नाही तर संपूर्ण ईशान्य भागाला झाला."