PM मोदींची कन्याकुमारीत आजपासून 45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात `या` ठिकाणाचं महत्त्वाचं स्थान
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 45 तास कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक इथं ध्यान करणार आहेत. पीएम मोदींच्या ध्यानधारणेदरम्यान सुमारे 2,000 पोलीस तैनात असतील.
PM Narendra Modi Meditation at Vivekananda Rock : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आजपासून 45 तास कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक मेमोरियल इथं (Vivekanand Rock) इथं ध्यानधारणा (Meditation) करणार आहेत. पंतप्रधानांचं आगमन आणि त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. पीएम मोदींच्या ध्यानधारणेदरम्यान समुद्रकिनारी लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून सुमारे 2,000 पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
पीएम मोदी 30 मे रोजी संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यानधारणा करणार आहेत. यादरम्यान समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून शनिवारपर्यंत समुद्र किनाऱ्यावर पर्यटक येऊ शकत नाहीत, तसंच खासगी बोटींनाही बंदी असणार आहेत. पीएम मोदी या ठिकाणी हेलिकॉप्टरने पोहोचतील. यासाठी हेलीपॅड तयार करण्यात आलं असून त्याची चाचणीही घेण्यात आली आहे.
असं आहे संपूर्ण वेळापत्रक
पीएम मोदी सर्वात आधी तिरुवनंतपुरमला पोहोचतील. तिथून ते एमआय-17 हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला जातील. समुद्र किनाऱ्यावर पीएममोदी सूर्यास्त पाहातील आणि त्यानंतर ध्यानधारणेसाठी बसतील. 1 जूनला दुपारी 3.30 वाजते ते कन्याकुमारीहून परततील.
विवेकानंद रॉक का?
पीएम मोदी यांनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीच्या समुद्रकिनाऱ्यावरील विवेकानंद खडकाची निवड केली आहे. स्वामी विवेकानंद यांना या ठिकाणी दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती असं मानलं जातं. भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएम मोदींनी ध्यानासाठी निवडलेल्या खडकाचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. विवेकानंद देशभर फिरून या ठिकाणी पोहोचले आणि तीन दिवस ध्यानधारणा केल्यानंतर त्यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं. स्वामी विवेकानंद यांचं विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदी वचनबद्ध आहेत. देवी पार्वतीच्यावतीने या स्थानाचा उल्लेख पवित्र धर्मग्रंथांमध्ये भगवान शिवाचे ध्यानस्थान म्हणून करण्यात आला आहे अशी माहितीही भाजप नेत्यांनी दिलीय.
विरोधकांची जोरदार टीका
पीएम मोदी यांच्या ध्यानधारणेवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी देशातला कोणताही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो आणि ध्यान करु शकतो. पण ध्यान करताना कोणी कॅमेरा सोबत घेऊन जातो का? असा टोला लगावला आहे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्याआधी 48 तास ध्यानधारणेच्या नावाखाली एसी रुममध्ये जाऊन बसतात, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. जर ते देव आहे तर ते ध्यान का करतायत? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलाय.