नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. येत्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असेल. कोरोनाच्या संक्रमणाचे चक्र तोडण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण अपयशी ठरलो तर देश २१ वर्ष मागे जाईल. देशातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. त्यामुळे नागरिकांनी पुढील २१ दिवसांसाठी घरातून बाहेर पडण्याचा साधा विचारही करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सामर्थ्यशाली देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. या देशांकडे साधनांची कोणतीही कमतरता नाही किंवा ते प्रयत्न करत नाहीत, असेही नाही. मात्र, कोरोना विषाणू इतक्या वेगाने फैलावत आहे की, सर्व तयारी करूनही या देशांपुढील समस्या वाढतच आहेत. त्यामुळे आपण असाच निष्काळजीपणा सुरु ठेवला तर आगामी काळात देशाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अर्थात एकमेकांपासून दूर राहणे, हाच एकमेव उपाय आहे. अन्यथा काही लोकांच्या बेपर्वाईमुळे अनेक कुटुंब आणि संपूर्ण देश धोक्यात येऊ शकतो, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला.


यावेळी नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इटलीतील आरोग्य व्यवस्थेचाही दाखला दिला. सध्याच्या घडीला या दोन देशांतील आरोग्य यंत्रणा जगात सर्वोत्तम मानल्या जातात. मात्र, त्यांनाही कोरोनाला रोखण्यात अपयश आले. सुरुवातीला ६७ दिवसांत एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. यानंतर दोन लाखांपर्यंतचा टप्पा अवघ्या ११ दिवसांत तर त्यानंतरच्या चार दिवसांतच कोरोनाग्रस्तांची संख्या तीन लाखांवर पोहोचली, याकडे लक्ष वेधत मोदींनी कोरोनाचे गांभीर्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 


लॉकडाऊनच्या २१ दिवसांच्या काळात भारताल मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. मात्र, सध्याच्या घडीला माझ्यासाठी प्रत्येक भारतीयाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्य सरकारांनाही आरोग्य व्यवस्थेलाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मोदींनी यावेळी सांगितले.