PM Narendra Modi on Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी 118 किमी लांबीच्या बंगळुरु-एक्स्प्रेसवेचं उद्धाटन (Bengaluru Mysuru Expressway inauguration) केलं आहे. निवडणुकांसाठी सज्ज असणाऱ्या कर्नाटकात हा उद्घाटन सोहळा पार पडला. या नव्या महामार्गामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसंच बंगळुरु आणि म्हैसूरमधील अनेक शहरं जोडली जातील. 8480 कोटी खर्च करत हा रस्ता बांधण्यात आला आहे. या रस्त्यामुळे बंगळुरु आणि म्हैसूरमधील अंतर 3 तास 75 मिनिटांनी कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महामार्गाच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. "राज्याचा विकास करत त्याच्या माध्यमातून तुमचं प्रेम परत करण्याचं डबल इंजिन सरकारचं ध्येय आहे. गेल्या काही दिवसांपासून लोक एक्स्प्रेस-वेबद्दल बोलत आहेत. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशातील तरुण या प्रकल्पाबद्दल उत्साहित आहेत," असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.


नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लक्ष्य केलं. "काँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यग्र आहे. पण मी गरिबांचं जीवनमान उंचावण्यात व्यग्र आहे. लोकांचा विश्वास हीच माझी ढाल आहे. मी कर्नाटकाला सक्षम करण्यात व्यग्र आहे," असं मोदींनी सांगितलं. 



काँग्रेसवर टीका करता नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की "केंद्रात 2014 च्या आधी काँग्रेस सरकारने गरिबांना उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. गरिबांसाठी असणारा पैसा काँग्रेसने लुटला". जेव्हा तुम्ही भाजपा सरकारला निवडून आणलं, तेव्हापासून राज्य समृद्ध झालं असल्याचं मोदी म्हणाले. 


"गेल्या नऊ वर्षात तब्बल तीन कोटी लोकांसाठी घरं बांधण्यात आली असून, यामध्ये लाखो घरं कर्नाटकात उभारण्यात आली आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत कर्नाटकमधील 40 लाख कुटुंबांना नळाचं पाणी पुरवण्यात आलं आहे," असा दावा नरेंद्र मोदींनी केला.



हे सर्व प्रकल्प 'सबका साथ, सबका विकास'साठी पाया रचत आहेत. मी सर्व कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टसाठी तुमचं अभिनंदन करतो असं मोदी म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो पार पडला. यावेळी नरेंद्र मोदींवर फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं.