अश्विनी पवार, प्रतिनिधी, झी मीडिया, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यासाठी २०१९ महत्त्वाचं ठरणार आहे. हे दोघेही सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. २०१४ मध्ये या दोघांच्याही हातात आपापल्या क्षेत्राची सूत्र आली. तेव्हापासून आजपर्यंत दोघांचंही आयुष्य एकसारखंच पुढे सरकतंय आणि आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मे २०१४मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. तर विराट कोहली डिसेंबर २०१४मध्ये भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी विराजमान झाला. २०१४मध्ये हे दोघेच आता भारताला तारणार असं एकप्रकारे वातावरण निर्माण झालं होतं. खरतरं गेली कित्येक वर्ष दोघेही आपआपल्या क्षेत्रात योगदान देत होते. 


मात्र २०१३पासून खऱ्या अर्थानं शक्तिशाली म्हणून दोघांचा खऱ्या अर्थानं उदय झाला. २०१३मध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. तर विराट कोहलीकडे २०१३मध्येच एकदिवसीय सघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. तर २०१४मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी नियुक्त झाले आणि विराटकडेही २०१४मध्ये कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 


देशाच्या नेतृत्त्वाची सूत्र हाती घेताच या दोघांनीही धडाक्यात सुरुवातही केली होती. मोदींनी मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. स्वच्छ भारत सारख्या योजनांचं तर चांगलंच कौतुक झालं. सर्जिकल स्ट्राईकच्या निर्णयामुळे तर मोदींची पोलादी पंतप्रधान अशी प्रतीमा बनली.


तिकडे कोहलीनं कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत शतक झळकावत साऱ्यांची वाहवा मिळवली. एवढच नव्हे तर कर्णधार बनल्यावर सुरुवातीच्या सलग तीन डावांमध्ये शतक झळकावणारा विराट इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला. 


मात्र कालांतरानं दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना टीकेला सामोर जावं लागलं. मोदींच्या नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामुळे मोदींवर चांगलीच टीका झाली. तर तिकडे विराट कोहली कर्णधार म्हणून घेत असलेल्या निर्णय अचूक नसल्यानं त्याला क्रिकेटरसिंकांच्या रोषाला सामोर जावं लागत आहे. 


मात्र आता दोघांचेही ग्रह थोडे बदलले दिसत आहेत. भाजपाला काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोर जावं लागलय. तर कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतानं एकदिवसीय आणि टी-२० मालिका गमावली. सध्याच्या २०-२० रनसंग्रामध्येही त्याच्या बंगळुरु संघाला सलग सहा पराभवाला सामोर जावं लागलं आहे. 


सध्या एकीकडे मोदी हटाव म्हटलं जात आहे तर दुसरीकडे कर्णधारपदावरुन कोहली हटाव, असा सूर आळवला जातोय. यामुळे आता मोदींसमोर भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्याचं तर कोहलीसमोर भारताला विश्वचषक जिंकून देण्याचं आव्हान असेल.