नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे. उद्या सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा निकाल लागणार आहे.  त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. 'अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल, तो कोणाचाही जय किंवा पराजय नसेल. भारताची शांती, एकता आणि सद्भावनेच्या महान परंपरेला आणखी बळ दिलं जावं, हीच आपल्या सगळ्यांची प्राथमिकता पाहिजे,' असं ट्विट मोदींनी केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देशातल्या न्यायपालिकेचा सन्मान समाजातल्या सगळ्यांनी ठेवला पाहिजे. सामाजिक-सांस्कृतिक संघटनांनी सगळ्या पक्षकारांनी सकारात्मक वातावरण बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. न्यायालयाच्या निकालानंतर सगळ्यांनी सलोखा ठेवला पाहिजे,' असंही मोदी म्हणाले.



'अयोध्या प्रकरणाचा निकाल उद्या येणार आहे. मागच्या काही महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयाने या विषयाची निरंतर सुनावणी घेतली. संपूर्ण देश या सुनावणीकडे औत्सुक्याने पाहत होता. यादरम्यान समाजाच्या सगळ्या वर्गांनी सद्भावना कायम ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत,' असं आणखी एक ट्विट मोदींनी केलं.



याआधीही मोदींनी अयोध्या प्रकरणावरुन भाजपच्या नेत्यांना इशारा दिला होता. अयोध्या प्रकरणावर कोणत्याही मंत्र्याने काहीही विधान करु नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आधीच दिला होता. देशात शांततेचं वातावरण कायम ठेवण्याचं आवाहन यावेळी मोदींनी केलं होतं.


देशातील विविध मुस्लीम तसेच हिंदू संघटनांकडून सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो येईल त्याचं स्वागत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ठीकठिकाणी बैठका घेऊन संघटनांच्या प्रमुखांना शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) देखील सर्वोच्च न्यायालयाचा जो ही निर्णय येईल त्याचं खुल्या मनानं स्वागत करण्याचं आवाहन केलं होतं.