श्रीनगर : देशाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षीही दिवाळीचा सण देशसंरक्षणार्थ तैनात असणाऱ्या जवानांसोबत साजरा केला. नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या नौशेरा येथे ते उपस्थित होते. या पोस्टवर त्यांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देत संपूर्ण देशातील जनतेचे आशीर्वाद मी या जवानांसाठी घेऊन आलो आहे असे उदगार काढले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवाळीचा एक दिवा या जवानांना समर्पित आहे असं म्हणत त्यांनी जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मी दरवर्षी दिवाळी जवानांसोबतच साजरा करतो असं म्हणत त्यांनी या क्षणाची शोभा वाढवली.


देशभरात आज दिवाळीचा दुसरा दिवस साजरा केला जात आहे, कुठे नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत. या क्षणी जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या सर्वांनाच मोदींनी दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.


‘नौशेरा येथे येताच, इथल्या भूमीला स्पर्श करताच एक वेगळी भावना मनात घर करुन गेली. ही भावना होती अभिमानाची. आपल्यासमोर जवानांच्या रुपात शूरतेचं जीवंत प्रतिक’, असल्याचं ते म्हणाले.


नौशेरा सेक्टवर हल्ला झाला, घुसखोरीही झाली पण इथं असणाऱ्या वीरांनी सैन्याची ताकद दाखवून देत शत्रूला चितपट केलं. यावेळी जवानांमधून भारत माता की जय, असा जयघोष  करण्यात आला. तर तिथं पंतप्रधानांनी नौशेरा आणि देशासाठी प्राण त्यागणाऱ्या सैन्यदल जवानांची नावं घेत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.


सर्जिकल स्ट्राईकमध्ये या ब्रिगेडनं निभावलेली भूमिका प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची. सर्जिकल स्ट्राईकचा दिवस लक्षात राहील, प्रत्येक जवान परत येईल याकडेच माझं लक्ष लागून राहिलेलं. माझे वीर जवान कोणत्याही हानीशिवाय परत आले, असं ते म्हणाले.


सर्जिकल स्ट्राईकनंतर नौशेरामध्ये जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा तेव्हा ते उलथून पाडण्यात आले, असं म्हणत त्यांनी यावेळी महाभारतातील उदाहरण देत पांडवांनी अज्ञातवासादरम्यान काही काळ इथं व्यतीत केल्याचं सांगितलं.


देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, या स्वातंत्र्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. असं म्हणत आपल्यापुढे असणाऱ्या अडचणी आणि आव्हानांकडे त्यांनी लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी देशातील रोजगार, व्यवसायाच्या प्रगतीकडे सर्वांचं लक्ष वेधलं.