नवी दिल्ली : काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर देश पुढे गेला असता. मात्र, ७० वर्षांच्या काळात काँग्रेसने काहीही केलेले नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 


काँग्रेसला तेव्हा कोणीही विरोध केला नाही!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत राष्ट्रवतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी यांनी हा हल्लाबोल केला. राष्ट्रपतींच्या भाषणाचा सन्मान झाला पाहिजे, असे मोदी म्हणालेत. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्ष फक्त नावाला होते. तत्कालीन मीडियाही सरकारच्या म्हणण्यानुसार वागत होती. त्यावेळी न्यायालायतही काँग्रेसकडून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. काँग्रेसला कोणीही विरोध करत नव्हते. पंचायतीपासून ते संसदेत काँग्रेसचाच आवाज होता. रेडिओही काँग्रेसचे होते. काँग्रेसनेच लोकशाहीचा आवाज दाबण्याचा  प्रयत्न केला, असा घणाघात मोदी यांनी केला.



आधीच्या सरकारने देशाचे तुकडे केले


गेल्या ७० वर्षांत फक्त एकाच कुटुंबाचे गुणगान गाण्यात येत असायचे. काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर देश पुढे गेला असता. काँग्रेसमुळे देशाचा विकास झाला नाही. घराणेशाही करणाऱ्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये. ७० वर्षांच्या पापाची शिक्षा देशाला भोगावी लागतेय. आधीच्या सरकारने देशाचे तुकडे केले, असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.


मोदींना प्रश्न, १५ लाखांचे काय झाले काय झाले?


दरम्यान, मोदींच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी करण्यात येत होती. विरोधकांकडून १५ लाखांचे काय झाले काय झाले, असे विचारले जात आहे. याशिवाय तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशला कमी निधी दिल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी केली. यावेळी विरोधकांची लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. मोदीजी जुमले बाजी बंद करो, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्यात.