काँग्रेस पक्ष म्हणजे `बेलगाडी`; मोदींचा सणसणीत टोला
काँग्रेस पक्ष केवळ विरोधाला विरोध करत आहे.
जयपूर: सध्या काँग्रेसचे अनेक नेते हे जामिनावर (बेल) बाहेर आहेत. त्यामुळे लोक आता काँग्रेसला 'बेलगाडी' म्हणायला लागलेत, असा सणसणीत टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. ते शनिवारी जयपूर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. मोदी यांनी म्हटले की, आजकाल लोक काँग्रेसला 'बेलगाडी' म्हणायला लागलेत. कारण, सध्या काँग्रसचे अनेक दिग्गज नेते व माजी मंत्री जामिनावर बाहेर आहेत, असे मोदींनी म्हटले. काँग्रेस पक्ष केवळ विरोधाला विरोध करत आहे. केंद्र सरकार किंवा वसुंधरा राजे सरकारने चांगले काम केले तरी विरोधक कधीच त्याचे कौतुक करत नाहीत. प्रत्येकजण केवळ आपले हितसंबंध कसे जपता येईल, हे बघतो. मी केलेल्या कामांमुळे एक विशिष्ट वर्ग दुखावला गेला आहे. यापूर्वीच्या सरकारने राजस्थानची अवस्था काय करुन ठेवली होती, हे कधीच विसरु नका, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.
मोदींच्या या सभेला केंद्र आणि राजस्थान सरकारच्या योजनांचे तब्बल सव्वा दोन लाख लाभार्थी उपस्थित होते. मात्र, यापैकी काही जणांना काळे कपडे घातल्यामुळे सभास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला. मोदींच्या कार्यक्रमादरम्यान कोणी आंदोलन किंवा निषेध करु नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. कार्यक्रमस्थळाच्या प्रवेशद्वारावर अनेकांचे काळे कपडे काढून घेतले जात होते. त्यामुळे बुरखा परिधान करुन आलेल्या मुस्लिम महिलांना कार्यक्रमस्थळावरुन परतावे लागले.