गंगा घाटावरच्या पायऱ्यांवर अडखळून नरेंद्र मोदी पडले अन्...
मोदींचे अंगरक्षकही त्यांच्या मदतीला धावून आले.
कानपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी कानपूर येथे राष्ट्रीय गंगा परिषदेची पहिली बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदींनी होडीतून फेरफटका मारत गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेचा आढावाही घेतला. यावेळी अटल घाटावर घडलेल्या एका प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी होडीतून नदीचा फेरफटका मारून परत जाण्यासाठी अटल घाटावर उतरले. मात्र, हा घाट वर चढून जात असताना पंतप्रधान मोदी पायऱ्यांवर अडखळले. यावेळी मोदींचा तोल जाऊन ते खाली पडण्याच्या बेतातच होते. परंतु, मोदींनी स्वत:ला कसेबसे सावरले. तोपर्यंत मोदींचे अंगरक्षकही त्यांच्या मदतीला धावून आले. सुदैवाने यावेळी मोदींना कुठलीही दुखापत झाली नाही. परंतु, या प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तत्पूर्वी मोदींनी कानपूरमधील बैठकीत नमामी गंगे प्रकल्पाच्या नव्या रणनीतीवर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हेदेखील उपस्थित होते. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, त्यांनी बैठकीला येणे टाळले.
कानपूरमध्ये गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित
कानपूरमधून गंगा नदी तब्बल २०७१ किलोमीटरचा प्रवास करते. याच टप्प्यात गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कानपूरमध्ये बैठक घेऊन आपण 'नमामी गंगे' प्रकल्पाविषयी गंभीर असल्याचा संदेश मोदींना या बैठकीतून देण्याचा प्रयत्न केला.