नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर मोदी सरकारवरील अपेक्षांचे ओझे आणखीनच वाढली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मंत्र्यांना तंबी दिली आहे. मंत्र्यांनी कोणत्याही स्वागत समारंभांमध्ये गुंतून न पडता तातडीने आपल्या कामाला लागावे, असे आदेश मोदींनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शपथविधीनंतर झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोदींनी मंत्र्यांना याबाबतच्या सूचना दिल्या. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अनेक मंत्री आपापल्या मतदारसंघात गेले होते. या सर्व मंत्र्यांना मोदींनी दिल्लीत परत बोलावून घेतल्याचे समजते. तसेच दिल्लीतील मंत्र्यांनी शहराबाहेर जाऊ नये, अशी ताकीदही मोदींनी दिली आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. यासाठी सर्वांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचे समजते. या बैठकीत मोदींनी प्रत्येक मंत्र्याला त्यांच्या खात्याकडून असलेल्या अपेक्षांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यासाठी कशाप्रकारे काम करावे, याचा सूचनाही मोदींनी संबंधित नेत्यांना दिल्या आहेत. 


लोकसभेतील विजयानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) पहिल्याच बैठकीत मोदींनी मंत्रिपद म्हणजे सेवा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मंत्र्यांनीही त्याच अनुषंगाने काम करावे, अशी मोदींची अपेक्षा आहे. यासाठी मोदींनी सुरुवातीलाच आगामी पाच वर्षांसाठीचे टार्गेट दिले आहे. सुरुवातीच्या १०० दिवसांनंतर संबंधित खात्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असेही मोदींनी सांगितले आहे.



३१ मे रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात नरेंद्र मोदी यांच्यासह ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मोदींच्या मंत्रिमंडळात सर्व वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'एनडीए'तील घटकपक्षांना यावेळी प्रत्येकी एक मंत्रिपद देण्यात आले होते.