नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावणाऱ्या मोदी सरकारकडून लवकरच आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान याचे संकेत दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मोदींनी काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा संदर्भ देत देशाचा एकोपा वाढवण्यासाठी भविष्यात अशाप्रकारचे आणखी काही निर्णय घेण्याचे संकेत दिले. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आज प्रत्येक भारतीय 'एक देश, एक संविधान' असे गर्वाने म्हणू शकतो. देशात एकीकरण प्रक्रिया निरंतर सुरु राहणे गरजेचे आहे. 


यापूर्वी आम्ही जीएसटीच्या माध्यमातून 'एक देश, एक कर' स्वप्न साकार केले. यानंतर ऊर्जा क्षेत्रात 'वन नेशन, वन ग्रीड' काम यशस्वीरित्या सुरु झाले आहे. 'वन नेशन, वन मोबिलिटी' कार्डची व्यवस्था आम्ही विकसित केली. आता 'एक देश, एक निवडणूक' या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, असे मोदींनी सांगितले. 


देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी भाजप गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. मात्र, यावर एकमत घडवून आणण्यात भाजपला अद्याप यश आलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने अनुच्छेद ३७० रद्द करणे आणि तिहेरी तलाकविरोधी विधेयक मार्गी लावल्याने 'एक देश, एक निवडणूक' संदर्भातही हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता आहे.