Ambulance ला रस्ता मोकळा करुन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी थांबवला ताफा, पाहा Video
पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर, पंतप्रधानांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ
PM Modi Convoy: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या गुजरात (Gujarat) दौऱ्यावर आहेत. गुजरात दौऱ्यात विविध योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येत आहे. आज पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज अहमदाबादमध्ये सभा संपल्यानंतर गांधीनगरला (Ahmedabad to Gandhinagar) परतत असताना मागून अॅम्ब्युलन्स (Ambulance) येत होती. पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ आपला ताफा थांबवण्याचा आदेश दिला आणि अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करुन दिला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अॅम्ब्युलन्स गेल्यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा पुढे गेला.
पीएम मोदींच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी या ट्रेनमधून गांधीनगर ते अहमदाबादमधल्या कालूपुर रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासही केला. मेक इन इंडिया (Make in India) मोहिमेला बळ देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांपैकी वंदे भारत ट्रेन हे एक यश आहे. 15 ऑगस्टला लाक किल्ल्यावर देशाला संबोधित करताना पंतप्रधांनी याबाबत घोषणा केली होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात 75 वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमात वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्याचं निरीक्षण केलं, त्यातल्या सुविधांचाही आढावा घेतला. यावेळी ट्रेन प्रवासात पंतप्रधानांनी रेल्वे कर्मचारी, त्यांचं कुटंब, महिला आणि युवा वर्गाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. वंदे भारत एक्स्प्रेसचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या इंजिनिअर्स, कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.