प्रयागराज: काँग्रेस पक्षाने नेहमीच सत्ता आणि पळवाटा वापरून न्यायव्यवस्थेची ताकद संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते रविवारी रायबरेलीमधील कार्यक्रमात बोलत होते. सध्या काही जणांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसचे आजपर्यंतचे वर्तन आणि त्यांनी रचलेल्या कारस्थानांवरून एकच सिद्ध होते ते नेहमी स्वत:ला देश, लोकशाही, जनता आणि न्यायव्यवस्था यापेक्षा उच्च समजतात. आपल्या इच्छेनुसार काम करण्यास नकार देणाऱ्या प्रत्येकाला संपवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. नुकत्याच घडलेल्या राफेल प्रकरणामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. काँग्रेस पक्ष केवळ लोकशाहीच्या बाजून उभे असल्याचे ढोंग करतो. अशा परिस्थिती देशातील नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ११०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी राफेल व्यवहार व शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोन प्रमुख मुद्द्यांवरून काँग्रेसला लक्ष्य केले. संरक्षण खरेदी व्यवहारात आतापर्यंत इटालियन व्यावसायिक ओटाव्हियो क्वात्रोचीचा सहभाग असायचा. पण आम्ही राफेल व्यवहारात त्यांना बाजूला ठेवले. त्यामुळे काँग्रेसचा तीळपापड झाल्याचे मोदी यांनी सांगितले. 



तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्नाटकात शेतकऱ्यांना दहा दिवसांत कर्जमाफी देणार असल्याची घोषणा केली, पण ६ महिने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही, हे मोदींनी जनतेच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून आम्ही स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू केल्या. १० वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसने स्वामीनाथन समितीच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.