नवी दिल्ली:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून प्लॅस्टिकमुक्त भारत अभियानाची घोषणा केली. यावेळी त्यांनी म्हटले की, यंदा आपण महात्मा गांधीजी यांची १५० वी जयंती साजरी करत आहोत. अशावेळी आपण हगणदरीमुक्त भारताबरोबरच देश प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी मोठ्या चळवळीचा प्रारंभ केला पाहिजे. त्यामुळे आपण यंदा प्लॅस्टिकमुक्तीचा संकल्प करूनच गांधी जयंती साजरी करूयात, असे मोदींनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिकमुक्त अभियान सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात हे प्लास्टिकमुक्त आंदोलन उभारले जाईल. प्लास्टिक पिशवी मिळणार नाही, आपल्यासोबत पिशवी आणावी, असं अनेक व्यापारी आणि दुकानदारांनी दुकानांबाहेर लिहिले आहे. यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल. प्रत्येक नागरिकाने यात आपापल्यापरीने योगदान द्यावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 


यावेळी त्यांनी सरकारकडून सुरु करण्यात येणाऱ्या फिट इंडिया अभियानाविषयीही सांगितले. २९ ऑगस्टपासून हे अभियान सुरु होईल. देशातील नागरिकांना तंदुरुस्त आणि सुदृढ ठेवणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट असेल. त्यामुळे महिला, लहान मुले, तरुण अशा सर्वांसाठीची हे फायदेशीर ठरेल. लवकरच याबाबत अधिक माहिती दिली जाईल, असेही मोदींनी यावेळी सांगितले.