है तैय्यार हम! कोरोनाच्या संकटकाळी आरोग्यसेवांसाठी १५ हजार कोटींची तरतूद
काहीही करा पण, घराबाहेर पडू नका
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधत कोरोनाशी लढण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची घोषणा होती ती म्हणजे संपूर्ण देश लॉकडाऊऩ करण्याची. देशातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने मोदी सरकारकडून हे पाऊल उचण्यात आलं.
काहीही करा पण, घराबाहेर पडू नका अशी अतिशय कळकळीची विनंती करत खुद्द पंतप्रधानांनी देशावासियांना पुढील धोक्याची चाहूल दिली. येत्या काळात अतिशय मोठा धोका टाळायला असेल तर आता ही बंधनं स्वीकारावी लागतील असं सांगत मोदींनी आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली.
कोरोना व्हायरसशी लढा देत असताना आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत येत्या काळासाठी आणि आरोग्यसेवांसाठी पंतप्रधानांनी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं जाहीर केलं. कोरोनाची चाचणी प्रक्रिया, पीपीई, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर या सर्व सुविधांसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे. तर, वैद्यकिय क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीसुद्धा हा निधी वापरला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
सध्याच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवेपासून दूर राहा. केंद्र राज्य आणि आरोग्य विभागाच्या आदेशांचं पालन करा असं सांगत डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका असा इशाराही त्यांनी दिला. स्वत:ची काळजी घ्या निकटवर्तीयांची काळजी घ्या. विजयाचा दृढ निश्चय करत या बंधनांचा स्वीकार करा, असा सूचक संदेश त्यांनी दिला.