`मेक इन इंडिया` नव्हे `रेप इन इंडिया`; राहुल गांधींची जळजळीत टीका
मोदी हे खोटारडे आणि भ्रष्टाचाराचे मेरूमणी असल्याचा आरोपही राहुल यांनी केला.
रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया'ची हाक दिली होती. मात्र, देशातील आजची परिस्थिती पाहता त्याचे रूपांतर 'रेप इन इंडिया'त झाल्याची जळजळीत टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ते गुरुवारी झारखंड येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात मोदींच्या पक्षाचा एक आमदार मुलीवर बलात्कार करतो. यानंतर त्या मुलीचा अपघातही होतो. मात्र, नरेंद्र मोदी याविषयी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले. या सगळ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन होत असल्याकडेही राहुल गांधींनी यावेळी सांगितले.
तसेच मोदी हे खोटारडे आणि भ्रष्टाचाराचे मेरूमणी असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे मोदी सांगतात. मग ते जनतेला रघुवर दास यांना मुख्यमंत्री करण्याचे आवाहन का करतात? केंद्राने झारखंडच्या विकासासाठी मोठा निधी पाठवल्याचे ते सांगतात. मग तरीही झारखंड पाणी आणि वीजेच्या सुविधांपासून वंचित का आहे? कारण केंद्राने पाठवलेले पैसे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी हडपले. मोदींना तुमच्या मुलभूत समस्या सोडवण्यापेक्षा अंबानी आणि अदानी यासारख्या उद्योजक मित्रांची तुंबडी भरण्यात जास्त रस असल्याची टीका यावेळी राहुल यांनी केली. याशिवाय, मोदी सरकार जात आणि धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करू पाहत असल्याचे सांगत राहुल यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाविषयीही नाराजी व्यक्त केली.