नवी दिल्ली : राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल गांधींचं अभिनंदन. भविष्यातल्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा, असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे.



शरद पवार यांच्याही शुभेच्छा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांचं अभिनंदन. भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. 



१६ डिसेंबरला घेणार अध्यक्षपदाची सूत्रे


१६ डिसेंबरला राहुल गांधी सोनिया गांधींकडून काँग्रेस अध्यक्षपदाची अधिकृत सूत्र स्वीकारतील. त्या दिवशी सकाळी ११ वाजता १३२ वर्षांच्या जुन्या पक्षाची धुरा अध्यक्ष या नात्याने स्वीकारल्यानंतर राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात देशभरातून आलेल्या पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतील.


राहुल गांधी एकमेव उमेदवार


अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हे एकमेव उमेदवार होते. त्यांच्या वतीने दाखल केलेले सर्व ८९ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन आणि सदस्य मधुसूदन मिस्त्री तसेच भुवनेश्वर कलिता राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.