नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत २४ जणांचा बळी गेला आहे. तर जखमींची संख्या १५० पेक्षा जास्त झाली आहे. दिल्लीतल्या या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं आहे. 'दिल्लीतल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा परिस्थिती सामान्य व्हावी यासाठी आणि शांततेसाठी प्रयत्न करत आहेत', असं ट्विट मोदींनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शांतता आणि एकोपा हीच आमची संस्कृती आहे. दिल्लीतल्या माझ्या बंधू आणि भगिनींना मी शांतता राखण्याचं आवाहन करतो. दिल्लीमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी आणि परिस्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी हे महत्त्वाचं आहे,' असं दुसरं ट्विट मोदींनी केलं आहे. 




दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत. तसंच दिल्ली-गाजियाबाद सीमा बंद करण्यात आल्यायत.  जाफराबाद आणि मौजपूरमध्ये पोलिसांनी आंदोलकांना हटवलंय.


दिल्लीतल्या परिस्थितीमुळे सीबीएसईची परीक्षा स्थगित करण्यात आल्यायत. हिंसा थांबली असली तरी तणाव कायम आहे. काल बंद करण्यात आलेले मेट्रोचे पाच स्टेशन्स आज  पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.


दुसरीकडे सोनिया गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्लीतला हिंसाचार म्हणजे गुप्तचर यंत्रणेचं अपयश असून  पंतप्रधानांनी पारदर्शक चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. तर काँग्रेस हिंसाचाराचं राजकारण करत असल्याचा पलटवार भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.


दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे


दिल्लीतील घटनेला गृहमंत्री जबाबदार, काँग्रेस-राष्ट्रवादीची राजीनाम्याची मागणी