नामिबियातून आणलेले 8 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या कार्यक्रमाला जातीने हजर होते.  पंतप्रधान मोदी यांनी पिंजऱ्याचे दरवाजे उघडत या चित्त्यांना राष्ट्रीय उद्यानात सोडले.  हे चित्ते पिंजऱ्यातून बाहेर पडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून या चित्त्यांचे बरेच फोटो काढले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इतिहासात डोकावलं, तर 16 व्या शतकात मुघल बादशाह जहांगीरने पहिल्यांदा चित्ता पाळला होता. त्याकाळी भारतामध्ये जवळपास  10,000 चित्ते होते, ज्यातले 1000 चित्ते मुघलांनी पाळले होते. 


1799 ते 1968 या कालावधीत भारतामधील अरण्यांत किमान 230 चित्ते होते. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुस्थानातून हा देखणा प्राणी नामशेष झाला. 


सतत होणारी शिकार, कमी होणारे अधिवास, काळवीट, सांबर, ससे यांची संख्या कमी होणे, ही चित्ता नामशेष होण्यामागची प्रमुख कारणे ठरली


चित्त्यांचे भक्ष्य दुर्मिळ झाल्याने त्यांनी गावात शिरून पाळलेली जनावरे मारायला सुरुवात केली होती, ज्यामुळे त्यांची शिकार करण्याचे प्रमाण वाढले. हेच या चित्त्यांच्या नामशेष होण्याचे प्रमुख कारण ठरले. चित्त्यांचे भारतात पुनर्सवन करण्याचे यापूर्वीही बरेच प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी झाले नव्हते. आता नामिबियातून 5 नर आणि 3 मादी असे एकूण 8 चित्ते आणण्यात आले असून यामुळे भारतातील चित्त्यांची संख्या पुन्हा वाढण्याल सुरुवात होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  सडपातळ, रुबाबदार, असलेले चित्ते प्रचंड चपळ असतात. भक्ष्याचा फडशा पाडण्यासाठी ते ताशी 112 किलोमीटर वेगाने धावू शकतात. जगभरात जवळपास 7000 चित्ते असून त्यातील बहुतांश चित्ते हे दक्षिण आफ्रिका, नामिबियात आढळतात. 




 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाचे विशेष आभार मानले असून त्यांच्या मदतीशिवाय हे चित्ते भारतात येणं शक्य नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे. चित्ते पुन्हा भारतात आल्याने पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांचेही अभिनंदन केले आहे.