पंतप्रधान मोदी एससीओ परिषदेसाठी किर्गीस्तानला रवाना; पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास टाळला
नरेंद्र मोदी यांच्या विमानासाठी पाकने आपली हवाई हद्द खुली केली होती.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी किर्गीस्तानच्या बिश्केक येथे होणाऱ्या दोन दिवसीय शांघाय सहयोग संघटन अर्थात एससीओच्या परिषदेसाठी रवाना झाले. या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हेदेखील सहभागी होणार आहेत.
दरम्यान, या परिषदेसाठी पाकिस्तानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानासाठी आपली हवाई हद्द खुली करण्यात आली होती. मात्र, भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर न करता ओमानमार्गे किर्गीस्तानला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोदींचे विमान ओमान, ईराण आणि मध्य आशिया असा प्रवास करत किर्गीस्तानमध्ये पोहोचेल.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. बिश्केक येथे १३ व १४ जून असे दोन दिवस ही परिषद होईल. चीनच्या नेतृत्त्वाखाली या समूहात २०१७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना प्रवेश देण्यात आला होता.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या परिषदेत सहभागी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या परिषदेत दोन्ही नेते एकमेकांना भेटणार का, याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही.