काहीजण दहशतवादाचा व्हायरस पसरवत आहेत; पाकिस्तानवर मोदी कडाडले
मोदींची ही टीका पाहता...
नवी दिल्ली : कोरोना विषाणू विरोधात सुरु असणाऱ्या वैश्विक संघर्षादरम्यानच भारत पाकिस्तान मुद्द्याने पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी पाकिस्तानवर सडकून टीका करत पुन्हा एकदा शेजारी राष्ट्राकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांवर निशाणा साधला.
Non-Aligned Movement (NAM) Summit मध्ये व्हिडिओ क़ॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत असताना त्यांनी नाव न घेता एकिकडे सारं जग कोरोनाशी लढा देत असानाच काही लोकं मात्र दहशतवाद, खोटी वृत्त, बनावट आणि दिशभूल करणाऱ्या व्हिडिओ असे घातक व्हायरस पसरवू पाहत आहेत, या शब्दांत पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या जम्मू - काश्मीर मुद्द्यायच्या वक्तव्यावर मोदींची ही टीका सध्या दोन्ही दोशांच्या संबंधांवर पुन्हा एकदा भाष्य करुन गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, भारताच्या सीमेत येणाऱ्या जम्मू आणि काश्मीर प्रांतातील परिस्थिती आणखी तीव्र होत असल्याचं अल्वी म्हणाले होते.
'काश्मीरींना या प्रांतात वैद्यकिय सेवा आणि वेगवान इंटरनेट सेवांपासून वंचित ठेवलं जात आहे'. असं ते या व्हिडिओ कॉन्सफरन्सदरम्यान म्हणाले. मुळात कोरोनाच्या वैश्विक महामारीविषयी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये परिस्तितीचा आढावा घेत चर्चा करणं अपेक्षित होतं. पण, अल्वी यांनी इथे मुख्य मुद्द्याला बगल देत काश्मीरचा मुद्दा प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला. पण, मोदींनीही अल्वींना थेट उत्तर देणं टाळत. मुख्य मुद्द्यावरच लक्ष केंद्रीत केलं.
कोरोना विषाणूच्या या प्रादुर्भावादरम्यान, आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बाबतीतील परिसीमा लक्षात आल्या. या विषाणूचं संकट ओसरल्यानंतरच्या काळात निपक्षपातीपण, समानता आणि मानवतेच्याच आधारावर जगाचं चक्र एका नव्या आखणीने चालवण्याची गरज आहे, असा सूर पंतप्रधान मोदी यांनी आळवला.