...म्हणून पंतप्रधान या राज्यातून निवडणूक प्रचाराला करणार सुरूवात
पंतप्रधान कोणत्या राज्यातून आपल्या प्रचाराला सुरूवात करणार आहेत याचा खुलासा नुकताच करण्यात आलाय.
तिरूअनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावावर 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपाने सहज जिंकली. मोदी हेच संपूर्ण निवडणूकीचा चेहरा राहिले. हर हर मोदी, घर घर मोदी म्हणत देशाने मोदींना पंतप्रधान बनवले. आता 2019 च्या निवडणूकीतही भाजप मोदी तंत्र वापरून विरोधकांना शह देण्यास सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारीपासून आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात करणार आहेत. विरोधकांच्या महाआघाडी दिवसेंदिवस मजबूत होत असताना देशात सत्ता टिकवणे हे भाजपासमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे मोदींच्या प्रत्येक राज्यातील दौऱ्यावर भाजपसोबतच देशाचेही लक्ष राहणार आहे. पंतप्रधान कोणत्या राज्यातून आपल्या प्रचाराला सुरूवात करणार आहेत याचा खुलासा नुकताच करण्यात आलाय.
केरळच्या पत्तनमथिट्टा येथून पंतप्रधान प्रचाराला सुरूवात करतील अशी माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष पी.एस. शीधरन पिल्लई यांनी माध्यमांना दिली. पंतप्रधान मोदी हे आंध्र प्रदेशमधून पत्तनमथिट्टा येथे येणार आहेत. या दरम्यानचे अंतर 120 किलोमीटर आहे. केरळच्या 140 जागा असलेल्या विधानसभा क्षेत्रात भाजपाचा एकमेव आमदार आहे. लोकसभा निवडणूकीत या ठिकाणी भाजप चांगल्या कामगिरीच्या प्रतिक्षेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत तिरुअनंतपुरमध्ये भाजप दुसऱ्या स्थानी होता.
भाजपचा डावपेच
पंतप्रधानांचे पत्तनमथिट्टा येथे येणं हा भाजपचा डावपेच असल्याचे म्हटले जात आहे. या जिल्ह्यातच सबरीमाला मंदिर आहे. या मंदिरात 10 ते 50 वर्षांपर्यंतच्या महिलांच्या प्रवेशावर बंदी होती. सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबरला आदेश देत हा निर्णय हटवण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरूद्ध भाजपाच्या कट्टर पुरातन पंथियांनी कित्येक दिवस जोरदार प्रदर्शन केले. केरळ पार्टी अध्यक्ष पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी रथयात्रा काढत भाजपाला या राज्यात पुढे जाण्याची हीच संधी असल्याचे म्हटले होते. भडकाऊ भाषण केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.