`काँग्रेसनं जाहीरपणे लोकशाहीची थट्टा उडवली`
काँग्रेसमध्ये जाहीरपणे लोकशाहीची थट्टा उडवली जात असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलाय.
भरुच : काँग्रेसमध्ये जाहीरपणे लोकशाहीची थट्टा उडवली जात असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलाय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सध्या मनिष तिवारी आणि शहजाद पूनावाला यांच्या ऑडिओ क्लिपमुळे काँग्रेसमध्ये महाभारत सुरु आहे. यावरुन मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलंय.
काँग्रेसमध्ये लोकशाहीबद्दल बोलणा-यांचा आवाज कसा दडपला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे शहजाद पूनावाला आहेत असं मोदींनी आपल्या सभेत म्हटलंय. पूनावाला यांनी याबाबत आवाज उचलून धैर्याचं काम केलं आहे असं मोदींनी म्हटलंय.
काँग्रेसने सरदार पटेल यांच्यावर अन्याय केल्याचंही मोदींनी म्हटलंय. तत्पूर्वी भरुच इथल्या सभेतही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेसने जाती धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम केल्याचा आरोप मोदींनी केलाय.
उत्तर प्रदेशची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होईल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केलाय. मोदींची तिसरी सभा राजकोटमध्ये होणार आहे. शिवाय सोमवारीही मोदींच्या चार सभा असून केवळ एकच सभा दक्षिण गुजरातमधल्या वलसाडमध्ये आहे. त्यानंतर उर्वरित तीन सभा सौराष्ट्रमध्ये होणार आहेत.