काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात, ईदच्या शुभेच्छा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
`ऑल इंडिया रेडिओ`च्या माध्यमातून पंतप्रधान जनतेशी संवाद साधत आहेत
नवी दिल्ली : भारताच्या संसदेत जम्मू काश्मीर संबंधित अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसमोर आले. 'ऑल इंडिया रेडिओ'च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी भारताच्या विशेषत: जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेला संदेश दिलाय.
काय म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
- काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात
- अनुच्छेद ३७० मुळे जम्मू-काश्मीर-लडाखमधल्या बंधु-भगिनींना काय भलं झालं? या प्रश्नाचं उत्तर कुणीही देऊ शकत नाही
- काश्मिरींना त्यांचे हक्क कधीच मिळाले नाहीत
- अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे जम्मू काश्मीरमधला भ्रष्टाचार संपुष्टात येईल, काश्मीरच्या विकासाला चालना मिळेल, विकासातील अडथळे दूर झालेत
- काश्मिरी नागरिकांची आता प्रगती होईल
- काश्मीरमधली मुलं शिक्षणापासून वंचित होती... जम्मू - काश्मीरमध्ये मुलींना इतर मुलींसारखे अधिकार नव्हते
- दलितांवरचे अन्याय थांबवण्याचा अल्पसंख्यांक कायदा काश्मीरमध्ये नव्हता, कामगार हिताचे कायदे काश्मीरमध्ये नव्हते
- जम्मू काश्मीरमधल्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचे सगळे आर्थिक फायदे आणि सुविधा मिळणार
- खाजगी कंपन्यांनाही जम्मू काश्मीरमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल
- नवीन व्यवस्थेत सर्वांना समान संधी मिळणार, नकारात्मक प्रभावातून जम्मू-काश्मीर बाहेर पडणार
- राज्यपाल राजवटीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रभावी काम
- दळणवळणाची साधनं वेगानं उभारण्यात आली
- कागदावरच्या योजना आता प्रत्यक्षात येत आहेत, जम्मू काश्मीरमध्ये नवी कार्यसंस्कृती, पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केलाय
- जम्मू काश्मीरमध्ये आधी अस्तित्वात असलेली व्यवस्था तशीच राहील
- तुमचा जनप्रतिनिधी तुमच्या माध्यमातूनच निवडला जाईल... अगोदरप्रमाणेच आमदार, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री तुम्हीच निवडणार आहात
- आपण सगळे मिळून जम्मू काश्मीरला दहशतवादाच्या कचाट्यातून सोडवू... काश्मीरमधील विभाजनवाद संपुष्टात येईल, असा विश्वास आहे
- केंद्रशासित प्रदेश हीच काश्मीरची गरज आहे
- दशकांच्या परिवारवादानं जम्मू काश्मीरच्या तरुणांना नेतृत्वाची संधी दिली नाही... आता तरुण विकासाचं नेतृत्व करतील
- जम्मू काश्मीरच्या तरुण-तरुणींना आवाहन करतो, की आपल्या विभागाच्या विकासाची धुरा हाती घ्या... पुढे या...
- जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा चित्रीकरण होणार... चित्रीकरणातून मोठा रोजगार मिळणार
- काश्मीरमधील पर्यटनाला नवी चालना मिळणार
- क्रीडा क्षेत्रातही काश्मीरला नव्या संधी... काश्मीरसाठी नवं क्रीड धोरण आखणार... तरुणांना क्रीडा क्षेत्र गाजवण्याची संधी
- लडाखसाठी सरकार नव्या योजना आखणार... लडाखमधील देशी वस्तूंना मोठी मागणी, स्थानिक खाद्यपदार्थांना चालना मिळणार
- लडाख सौरऊर्जेचं केंद्र बनणार, स्थानिक कौशल्याला प्रोत्साहन मिळणार, शिक्षण-आरोग्य-शिक्षणाच्या सोयी मिळणार
- आश्वासन देऊ इच्छितो की हळूहळू परिस्थिती सामान्य होईल आणि तुमच्या अडचणी कमी होतील
- काश्मीरचं दु:ख हे १३० कोटी जनतेचं दु:ख, काश्मिरी जनतेला परिवर्तन हवंय
- काश्मिरींना संधी मिळणं हा त्यांचा अधिकार आहे
- काही मूठभर लोक वातावरण बिघडवतात
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा... काश्मिरात मोठ्या उत्साहात ईद साजरी होईल... ईदसाठी काश्मीरमध्ये जाणाऱ्यांना सहकार्य करणार
- जम्मू काश्मीर भारताचा मुकूट आहे. काश्मिरींनी परिस्थितीचा धैर्यानं आणि यशस्वी सामना केला.
- नव्या भारतासोबत नव्या जम्मू काश्मीर आणि नव्या लडाखचीही निर्मिती करूया
भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक बहुमतानं मंजूर झालंय. राष्ट्रपतींनीही राजपत्रावर स्वाक्षरी करत या बदलांना हिरवा कंदिल दाखवला. यानुसार, जम्मू काश्मीरचं दोन भागांत विभाजन करण्यात आलंय. जम्मू-काश्मीरला असलेला राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलंय. यामधील एक केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरला विधानसभा असेल तर दुसरा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये मात्र विधानसभा राहणार नाही.