शुभ्र फेटा, कपाळी टिळा अन् हातात डमरू; उत्तराखंडमधील अदभूत ठिकाणाहून PM मोदींचं कैलास दर्शन
PM Modi Kailash Darshan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच उत्तराखंडमधील पिथौरागढ भागाला भेट दिली. ज्यानंतर या भेटीदरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले.
PM Modi Kailash Darshan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या वारंवार पाहिले जात असून, यामागं कारण ठरत आहे तो म्हणजे त्यांच्यासमोर दिसणारा पवित्र कैलास पर्वत. पंतप्रधानांनी गुरुवारी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील कैलास व्ह्यू पॉईंटला भेट दिली. या अदभूत आणि पर्वतरांगांच्या कुशीत दडलेल्या ठिकाणहून त्यांनी पवित्र कैलास पर्वताचं दर्शन घेतलं. जोलिंगकोंग या भागात असणाऱ्या ठिकाणाहून कैलासाचं पूर्ण विहंगम दृश्य सहजपणे पाहता येतं. ज्यामुळं आता भारतीयांना चीनच्या ताब्यात असणाऱ्या तिबेट प्रांतात जाण्याची गरज भासणार नाहीये.
कैलास दर्शनासोबतच पंतप्रधानांनी पार्वती कुंड येथेही पूजाअर्चा केल्याचं पाहायला मिळालं. हे देशातील असं एक ठिकाण आहे जिथून अवघ्या 20 किमी अंतरावर चीनची सीमा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारत- चीन सीमेवरून कैलास पर्वताचं दर्शन घेणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
पुढील काळात अध्यात्मिक पर्यटनाला मिळणार चालना
उत्तराखंजडमधील धारचूला येथून 70 किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून साधारण 14 हजार फूट उंचीवर असणाऱ्या गुंजी नावाच्या गावात पुढील काही वर्षांमध्ये अध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं मोठा विकास होणार आहे. येत्या काळात इथं शिवभक्तांची गर्दी होणार आहे. कैलास व्ह्यू पॉईंट, ओम पर्वत आणि कैलासच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांसाठी धारचूलानंतर हाच एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. परिणामी इथं यात्री निवास, हॉटेलंही उभी राहणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
हेसुद्धा वाचा : मोठी बातमी; महाविद्यालयीन अभ्यासक्रमात सरसकट सर्व शाखांत नव्या विषयाचा समावेश
काय आहे या भागाचं भौगोलिक महत्त्वं?
गुंजी व्यास खोरं हे एक प्रकारच्या सुरक्षित भूखंडावर आहे. इथं भूस्खलनाचा धोका नसून, पूराचाही धोका नाही. सध्याच्या घडीला इथं फक्त 20 ते 25 कुटुंब राहतात. पण, येत्या काळात या कुटुंबांसाठी इथं उदरनिर्वाहाचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. गुंजीच्या उडव्या बाजूला नाभीढांग, ओम पर्वत आणि कैलास व्ह्यू पॉईंटचा रस्ता आहे, ज्यामुळं तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या भाविकांसाठी हे गाव सोयीचं आहे.