पंतप्रधान मोदींचा श्रीलंका दौरा; दौऱ्यानंतर वेंकटेश्वर मंदिरात दर्शन घेणार
श्रीलंका दौऱ्यानंतर ते भगवान वेंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.
कोलंबो : मालदीव दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोत दाखल झाले आहेत. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांचे स्वागत केले. कोलंबो विमानतळावर मुलांनी खास स्वागत केले. या दौऱ्यात पंतप्रधान श्रीलंकेच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.
श्रीलंकेतील इस्टर दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यात २५० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात ११ भारतीयांचा समावेश होता. श्रीलंकेमधील पंतप्रधान मोदींचा हा तिसरा दौरा आहे. याआधी त्यांनी २०१५ आणि २०१७ मध्ये श्रीलंका दौरा केला आहे.
नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या द्विपक्षीय चर्चेत ते दहशतवादाविषयी मुद्दांवरही चर्चा करणार आहेत. मोदींनी राष्ट्रपती भवनमध्ये वृक्षारोपणही केले. तसेच श्रीलंकेतील हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
आज श्रीलंकाहून निघाल्यानंतर भारतात परतल्यावर ते तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तेथे ते पूजा करतील. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान रविवारी सायंकाळी कोलंबोहून तिरुपतीजवळील रेनीगुंटा विमानतळावर पोहचणार आहेत. दुसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर ते पहिल्यांदाच या मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत.