पीएनबी घोटाळा : फरार नीरव मोदी `या` देशात राहतोय
ईडीने नीरव मोदीच्या १७ ठिकाणांवर छापेमारी केली.
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेला ११,४०० कोटी रूपयांचा चूना लावणा-या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय..
नीरज आणि काही अन्य लोकांविरोधात २८० कोटी रूपयांच्या मनी लॉंड्रिंगच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ईडीने छापेमारी केली. ईडीने मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्ये छापेमारी केली. देशाबाहेर पळालेल्या नीरजचा शोध सुरू आहे. दरम्यान नीरजचा पत्ता सापडल्याचे वृत्त आहे.
पासपोर्ट रद्द
नीरव मोदी सध्या ज्या देशात आहे तिथेच राहू शकेल. पासपोर्ट रद्द केल्यानंतर तो कुठे जाऊ शकत नाही.
आतापर्यंत ५,६०० कोटी रुपयांची त्याची संपत्ती सील करण्यात आल्याचे,परराष्ट्रमंत्रालय प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले.
मोदीची इतकी संपत्ती जप्त
ईडीने केलेल्या छापेमारीत तब्बल ५,१०० कोटी रूपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ईडीने नीरव मोदीच्या १७ ठिकाणांवर छापेमारी केली.
ही कारवाई पंजाब नॅशनल बॅंकेच्या तक्रारीनंतर केली गेली. एजन्सीने नीरव मोदी, त्याची पत्नी एमी, भाऊ विशाल आणि उद्योगपती मेहुल चौकसी यांच्या विरोधात मनी लॉंड्रींगची तक्रार दाखल केलीये.
न्यूयॉर्कमध्ये मोदी
माध्यमात आलेल्या वृत्तानुसार नीरज न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये लपला आहे. वृत्त वाहिन्यांच्या माहितीनुसार, जेडबल्यू मॅरियटच्या एसेस हाऊसमध्ये तो आहे. हॉटेलच्या ३६ व्या माळ्यावर आलिशान फ्लॅटमध्ये तो राहतोय.
कारवाईला वेग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तडकाफडकी सुरू झालेल्या कारवाईत मुंबई, गुजरात आणि दिल्लीतील कमीत कमी दहा जागांवर छापेमारी केलीये.
यात मोदीचं मुंबईच्या कुर्लातील घर, काला घोडा येथील डिझायनर ज्वेलरी दुकान, बांद्रा आणि लोअर परेलमधील कंपनीच्या कार्यालयातील तीन ठिकाणांवर, गुजरातच्या सूरतमधील तीन ठिकाणे आणि दिल्लीच्या डिफेंस कॉलनी आणि चाणक्यपुरी परीसरातील मोदीच्या शो-रूमचाही समावेश आहे.