भोपाळमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीवरुन पोलीस आणि सीआरपीएफ आमने-सामने
आयकर विभागामार्फत देशभरात ५० ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सल्लागार आणि स्वीय सहाय्य्कांसोबतच नातेवाईकांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या घरावर छापेमारीसाठी आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी रोखले. यामुळे आयकर विभागाच्या सोबत असलेले सीआरपीएफचे जवान आणि मध्य प्रदेश पोलिस समोरासमोर आलेले पाहायला मिळाले.
कमलनाथ यांचे सल्लागार असलेल्या अश्विन शर्मांच्या घराबाहेर सुरक्षिततेसाठी मध्य प्रदेशचे पोलीस कार्यरत होते. या दरम्यान छापा टाकण्यासाठी आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी शर्मांच्या घरात जाण्यास मज्जाव केला. यामुळे आयकर अधिकाऱ्यांसोबत असलेल्या सीआरपीएफचे जवान आणि मध्य प्रदेशचे पोलिस आमनेसामने आले.
यासोबतच आयकर विभागाने कमलनाथ यांच्या स्वीय सहाय्यक प्रवीण कक्कड तसेच सल्लागार राजेंद्रकुमार मिगलानी यांच्या घरावरदेखील छापा मारला आहे. आयकर विभागाने मध्यरात्री ३ वाजता प्रवीण कक्कड यांच्या इंदूरमधील विजयनगरातील घरावर छापा मारला. या छापेमारीतून आयकर विभागाने ९ कोटी रुपये जप्त केले आहेत. प्रवीण कक्कड यांच्या घरासोबतच शोरुम, बीएमसी हाईट्स येथील कार्यालय आणि अन्य ठिकाणी देखील चौकशी केली जात आहे.
प्रवीण कक्कड हे काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेश पोलिसात अधिकारी होते. परंतू त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. पोलीस विभागात असताना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आयकर विभागामार्फत देशभरात ५० ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. यामध्ये भूला, इंदूर, गोवा आणि दिल्लीतील तब्बल ३५ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ३०० पेक्षा जास्त आयकर अधिकाऱ्यांचा समावेश होता.
नातेवाईकांच्या घरी छापा
या कारवाईमध्ये कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी, अमिरा, आणि मोजर बीयर कंपनीचा सहभाग आहे. ३०० हून जास्त अधिकारी या छापेमारीत सहभागी आहेत. दिल्ली आयकर विभागाने ही कारवाई केलीय.