Crime News: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक असं प्रकरण समोर आलं आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हीदेखील घरातील नोकरांकडे लक्ष देण्यास सुरुवात कराल. याचं कारण पोलिसांनी एका मोलकरणीला अटक केली आहे, जिने 5 वर्षांत तब्बल 11 लाख रुपये चोरी केले आहेत. पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली तिला अटक केली असून, तिच्याकडे सापडलेली रक्कम पाहून कुटुबीयांसह पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत. महिला एका डॉक्टर दांपत्याच्या घरात काम करत होती. 5 वर्षांपूर्वी कुटुंबाने या मोलकरणीला घरी कामावर ठेवलं होतं. यानंतर रोज ती घरातून पैसे चोरत होती. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडच्या हल्दाना येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी मोलकरणीला अटक केली आहे. आरोपी मोलकरीण डॉक्टर दांपत्याच्या घऱात कामाला होती. 2019 मध्ये घरकामासाठी तिला ठेवण्यात आलं होतं. 2022 पासून त्यांच्या घऱात चोरी होत होती. पण रक्कम छोटी असल्याने त्यांनी फार लक्ष दिलं नाही. दरम्यान, डॉक्टर दांपत्याने आपल्या कपाटात काही दिवसांपूर्वी 10 लाख रुपये ठेवले होते. पण दोन दिवसांनी त्यांनी रक्कम मोजली असता त्यात 5 लाख रुपये कमी होते. यानंतर त्यांनी कॅमेऱ्याच्या सहाय्याने मोलकरणीला रंगेहाथ पकडलं. यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. 


डॉक्टर राहुल सिंह यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांची पत्नी डॉक्टर असून शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करतात. नैनीताल रोडवर त्यांचं घर आहे. 2019 मध्ये त्यांनी मधू नावाच्या एका महिलेला घरकामासाठी ठेवलं होतं. तिला महिना 4500 रुपये पगार दिला जात होता. यादरम्यान, 2022 मध्ये अचानक आमच्या घरातून पैसे चोरीला जाऊ लागली होती. रक्कम जास्त नसल्याने आम्ही त्याकडे फार लक्ष दिलं नाही. 


कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली चोरी


डॉक्टर राहुल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलैला त्यांनी कपाटात 10 लाख रुपये ठेवले होते. 25 तारीखला पैसे मोजले असता त्यातील 4 लाख 70 हजार रुपये कमी झाले होते. आम्हाला मोलकरणीवर संशय आल्याने कपाटात हँडी कॅम रेकॉर्डिंग मोडवर ठेवला. तसंच नोटांच्या सीरियल नंबरचे फोटोही काढून ठेवले. यानंतर शनिवारी आम्ही पुन्हा एकदा पैसे मोजले असता 7500 रुपये कमी होते. कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग तपासली असता मधु चोरी करत असल्याचं त्यात कैद झालं होतं. 


पोलिसांनी जप्त केले 4 लाख 77 हजार रुपये


डॉक्टर राहुल सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मधूच्या घराती झडती घेतली. पोलिसांना यावेली 4 लाख 77 हजार रुपये सापडले आहेत. पोलिसांनी जेव्हा मधुचं बँक अकाऊंट तपासलं तेव्हा त्यांना त्यात 6 लाख 30 हजार रुपये सापडले. मधुने पोलिसांना बँकेत जमा केलेली रक्कम चोरीची असल्याची माहिती दिली आहे. मधूचं बँक खातं सील केलं जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे.