तेलंगणाच्या हनुमाकोंडा जिल्ह्यातील एक अजब व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेड्डीपुरम पोलिसांना तलावात गेल्या 8 तासांपासून एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर  पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पोहोचले तेव्हा मृतदेह किनाऱ्यावर आला होता. शरिराची काहीच हालचाल होत नसल्याने पोलिसांनाही हा मृतदेह असल्याचंच वाटत होतं. पण जेव्हा पोलिसांनी मृतदेहाचा हात धरुन बाहेर खेचलं तेव्हा तो एकदम उभा राहिला. हे पाहिल्यानंतर पोलिसांसह स्थानिक नागरिकही आश्चर्याने पाहत उभे राहिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्याच्या कोवेलाकुंटाच्या रेड्डीपुरम येथे ही घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत एक व्यक्ती पाण्यातच पडलेला होता. हे पाहिल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. आंघोळीसाठी तलावात उतरलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असावा अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली. 



स्थानिकांनी फोन केल्यानंतर पोलीसही तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पण घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर खेचला असता तो अचानक उभा राहिल्याने धक्काच बसला. ती व्यक्ती जिवंत असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांना आश्चर्यही वाटत होतं आणि हसूही आवरता येत नव्हतं.


या व्यक्तीची ओळख पटली आहे. नेल्लोर जिल्ह्यातील कावलीमधील तो रहिवासी आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, गेल्या 10 दिवसांपासून तो ग्रेनाइट खाणीत कडक उन्हात काम करत होता. शरिराला आराम देण्यासाठी आणि उकाड्यापासून सुटका करण्यासाठी आपण पाण्यात पडलेलो होतो असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.