एन्काऊंटरला गेलेल्या पोलिसांना बंदुकीनं दिला दगा, तोंडानंच केला आवाज `ठॉय-ठॉय`
एका पोलीस उपनिरीक्षकाला मात्र त्याच्या बंदुकीनं दगा दिला
नवी दिल्ली : उत्तरप्रदेश पोलिसांचा एक हास्यास्पद पण तितकीच धक्कादायक कहाणी समोर येतेय. त्याचं झालं असं की, संभल पोलीस गुन्हेगारांचा पाठलाग करत जंगलापर्यंत पोहचले... यावेळी, त्यांच्याकडे शस्रही होते... गुन्हेगार काही अंतरावर असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी आपली शस्र सज्ज केली... काही पोलिसांनी गोळ्याही झाडल्या... परंतु, एका पोलीस उपनिरीक्षकाला मात्र त्याच्या बंदुकीनं दगा दिला. प्रयत्न करूनही बंदुक चालत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना तोंडानंच 'ठॉय-ठॉय'चा आवाज काढावा लागला.
ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडलीय. असमोली पोलीस स्टेशनचे पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये ही चकमक झाली. शस्रांनी दगा दिल्यानंतरही पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केलीय. या गुन्हेगारावर २५ हजार रुपयांचं बक्षीसही होतं. तर दुसरा गुन्हेगार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.
या चकमकीत एक इन्स्पेक्टर आणि एक पोलीस शिपाई गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शस्रांनी दगा दिल्यानंतर 'ठॉय-ठॉय' आवाज तोंडातून काढणाऱ्या पोलिसांना मात्र सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय.