शिमला : हिमाचल प्रदेश सरकारने अभिनेत्री कंगना रनौतला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. सीएम जयराम ठाकूर म्हणाले की, कंगना ही राज्याची कन्या आहे. त्यामुळे तिला सुरक्षा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरून कंगना रनौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या विषयावर सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वादाला आता राजकीय वळण लागत आहे. या संदर्भात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, 'राज्य सरकारने कंगना रनौत यांना राज्यात सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुंबई दौर्‍यादरम्यान सुरक्षा पुरवण्याबाबतही सरकार विचार करत आहे.'


भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, त्यांच्या बहिणीने शनिवारी मला फोन करून सुरक्षेबाबत मागणी केली. त्यांच्या वडिलांनीही राज्य पोलिसांना संरक्षणाची मागणी केली होती. म्हणूनच मी डीजीपींना राज्याच्या अभिनेत्रीला सुरक्षा देण्यास सांगितले आहे.'


मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, "ती हिमाचल प्रदेशची मुलगी आणि सेलिब्रेटी असल्याने तिला सुरक्षा पुरविणे हे आपले कर्तव्य आहे." कंगना 9 सप्टेंबरला मुंबईला येणार आहे आणि या काळात सरकार त्यांना सुरक्षा देण्याच्या विचारात आहे.'


अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगना रनौतच्या वक्तव्यावर मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिला. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.