पोलिसांचा शेतकरी आंदोलकांवर पाण्याचा मारा, आंदोलक आक्रमक
आंदोलक हिंसक होण्याची शक्यता
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी काढण्यात आलेला भव्य मोर्चा राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. ही यात्रा दिल्लीत रोखण्यात आली आहे पण यादरम्यान आंदोलक हिंसक झाल्यामुळे त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात येत आहे.
भारतीय किसान यूनियनच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले होते. हरिद्वारपासून दिल्लीत येतांना शेतकऱ्यांना दिल्लीत परवानगी मिळाली नव्हती. तरीही शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आहे. यानंतर आता आंदोलक आणखी हिंसक होतांना दिसत आहे. दिल्ली-यूपी बॉर्डरवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. पूर्व दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आली आहे.
कर्जमाफी आणि विजेचं दर याबाबतीत किसान क्रांती पदयात्रा 23 सप्टेंबरला हरिद्वार येथून सुरु झाली होती. त्यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर आणि मेरठ मार्गे सोमवारी शेतकरी गाजियाबाद येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांना येथेच रोखण्याचा प्रयत्न झाला.
शेतकऱ्यांना गांधी जयंतीच्या निमित्ताने राजघाट ते संसद भवन अशी पदयात्रा करायची होती. पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. पोलिसांनी दिल्लीत येणाऱ्या मार्गावर बॅरिगेटिंग केली आहे. यूपी पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी दिल्लीकडे येणारे मार्ग बंद केले आहेत.