मुंबई : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा केली गेली. १९९३ मधल्या दंगलीत सहभाग असलेल्या सर्वांची एफ आय आर नोंदी तपासल्या जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा विचार करता, सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. संशयितांवर कारवाई केली जात आहे. या बैठकीनंतर पोलिसांच्या सायबर सेलनेही फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये निकालापूर्वी तसंच निकालानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केली जाणारी प्रक्षोभक भाषणं, माहिती आणि व्हिडिओंवर बारिक लक्ष ठेवलं जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्या रामजन्मभूमी वादग्रस्त जमिनीचा निकाल आता कोणत्याही क्षणी लागू शकतो. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी महत्त्वाची बैठक बोलावलीय. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक यांना सरन्यायाधीशांनी बैठकीसाठी बोलावलं आहे. आज दुपारी १२ वाजता सर्वोच्च न्यायालयात ही बैठक होणार आहे. 


अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयानं सर्वच महत्त्वाच्या राज्यांना एक पत्र पाठावलं आहे. यामध्ये राज्यातील सुरक्षा वाढवण्यास सांगितलं आहे. गरज असेल तर संवेदलशील ठिकाणी अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.