काँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ऑफर देण्यात आली आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आणि राज्यसभेची खासदारकी यापैकी एक हवे असल्याचे सूत्रे सांगतात. त्यामुळे कमलनाथ ज्योतिरादित्य यांची एक इच्छा पूर्ण करून आपली खूर्ची वाचवू शकतात. दरम्यान, भाजपकडूनही आज संध्याकाळी संसदीय बैठकीत बोलविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडूनही हालचाली सुरुवात झाली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश नक्की काय होणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर दुसरीकडे राजस्थानचे नेते काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट, माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याकडून मध्यस्ती करण्याचा प्रयत्न झाला आहे.
शिवराजसिंह चौहान यांची प्रतिक्रिया
मध्य प्रदेश सरकारमध्ये ३४ मंत्र्यांचा कोटा आहे. सध्या कमलनाथ सरकारमध्ये २९ मंत्री आहेत. त्यामुळे उरलेली ५ मंत्रिपदं ज्योतिरादित्य समर्थकांना कमलनाथ देऊ शकतात. कदाचित यामुळे ज्योतिरादित्यांचे समाधान होऊन कमलनाथ सरकारवरचे संकट टळू शकते. याखेरीज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या प्रकरणात लक्ष घालून ज्योतिरादित्य यांचे मन वळवू शकतात. मात्र तरीही तोडगा निघाला नाही, तर सोनिया गांधी एखादा मधला मार्ग काढू शकतात, याचीही उत्सुकता आहे.
सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाचा राजीनामा
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर राजकीय संकट ओढावल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळातील २० मंत्र्यांनी कमलनाथ यांना आपला राजीनामा दिलेत. शिवाय कमलनाथ यांना मंत्रिमंडळ पुनर्चनेसाठी मंत्र्यांनी अधिकारही दिलेत. मात्र दुसरीकडे कमलनाथ यांच्याविरोधात ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडाचा झेंडा उभारल्याचं दिसत आहे. त्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे.
सिंधिया गटाची तीव्र नाराजी
भाजपच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री होणार का? की पुन्हा एकदा शिवराज सिंग चौहान यांचे सरकार येणार आणि ज्योतिरादित्य त्यांना पाठिंबा देणार? या चर्चांना उधाण आले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी काल दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली होती. मध्यप्रदेश सरकारमधले १७ आमदार हे बंगळुरूला गेलेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये ६ मंत्र्यांचाही समावेश आहे. तसंच हे सगळे सिंधिया यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे आता मध्यप्रदेशात राजकीय भूकंप होणार का? धुळवडीच्या दिवशीच राजकीय रंग उधळले जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पायलट, देवरा यांची मध्यस्ती
राजस्थानचे नेते काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट, माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याकडून मध्यस्ती करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील राजकीय पेच लवकरच संपेल अशी आशा आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी एका स्थिर सरकारची आवश्यकता आहे.