Currency Politics : भारतातल्या चलनी नोटांवर (Indian Currency) महात्मा गांधीजींचा (Mahatma Gandhi) फोटो आहे. मात्र गांधीजींऐवजी नोटांवर महापुरुषांचे फोटो असावेत या मागणीसाठी अनेक पक्ष सरसावलेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेतेही यात मागे नाहीत. सर्वात आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) नोटांवर गणपती आणि लक्ष्मी असावेत अशी मागणी केली. त्यानंतर वेगवेगळे राजकारणी वेगवेगळी मागणी करु लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते राम कदम(Ram Kadam) यांनी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असावेत अशी मागणी करणारं ट्विट केलं आहे. तर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा अशी मागणी केलीय. आता भाजपचे नेते अशी मागणी करतायत तर काँग्रेसचे नेतेही मागे कसे राहतील. काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असावा अशी मागणी केलीय. तर ठाकरे गटानं (Thackeray Group) नोटेवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असावा अशी मागणी केलीय.


नोटांवर कोणत्या महापुरुषाचा फोटो असावा याचा वाद सुरु असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मात्र सावध भूमिका घेतलीय. तर एमआयएमनं केजरीवालांवर निशाणा साधलाय. 


गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं अरविंद केजरीवालांनी गणपती आणि लक्ष्मीच्या फोटोची मागणी करून हिंदूत्वाचं कार्ड खेळल्याची चर्चा आहे. रूपया डॉलरच्या तुलनेत घसरत असताना त्यावर उपाय शोधण्याचं सोडून सर्व पक्षांचे नेते आपापल्या सोयीचे फोटो घेऊन केजरीवालांच्याच मार्गावर धावत सुटले आहेत. पोटापाण्यासाठी देवात पैसा शोधणाऱ्यांचं आपण समजू शकतो. मात्र आपले राजकारणी आता पैशांमध्येच देव शोधू लागल्यानं पुन्हा एकदा विकासाचं राजकारण बाजूला पडण्याची भीती आहे.