नवी दिल्ली : अयोध्येच्या साध्वी गुरु माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी नुकतीच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी (Mumbai Municipal Election) मनसेची हिंदूत्वाच्या मुद्द्याकडे वाटचाल असल्याची चर्चा रंगली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपसोबत जावं, असंही कांचन गिरी यांनी म्हटलं होतं.


राज ठाकरे यांचं हिंदूत्व बेगडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेच्या हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना (Shiv Sena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांचं हिंदूत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलेलं आहे. परप्रांतियांचा प्रश्न उभा करत उत्तर भारतीयांना मारायचं, बिहारी लोकांची सालटी काढायची हे धंदे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केले आहेत, आणि आता भाजप राज ठाकरेंना शिवसेनेशी लढण्यासाठी शिखंडी सारखा वापर करत असतील, तर ते योग्य ठरणार नाही, उलट भाजपची सर्व मतं शिवसेनेकडे येतील, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.


कांचनगिरी कोण आहेत?


कोण या कांचनगिरी, आम्ही तर पहिल्यांदाच पाहिलं आहे. पण गेल्या काही वर्षात साधुसंतांचा बुरखा पांघरूण ज्यांनी नाटक केलं, त्या सर्वांना कशापद्धतीने धडा शिकवला जातोय, हे आपण सर्वजण पाहतोय, त्यामुळे कांचनगिरी काय आणि राज ठाकरे काय, हिंदूत्वाचा वापर ह केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी करत आहेत असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. 


मुंबईवर सर्वांचा डोळा


हिंदूत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेशी राज ठाकरे यांनी जेव्हा बेईमानी केली, तेव्हा त्यांची बुद्धी कुठे गेली होती. मुंबई नगरीवर या सर्वांचा डोळा आहे, यांची नजर मुंबई महानगरपालिकेवर आहे. पण शिवसेनेविरोधात कोणीही उभं राहिलं तरी मुंबईकर शिवसेनेवरच विश्वास ठेवणार, केवळ हिंदूत्व म्हणून नाही, तर मुंबई शहराचा विकास शिवसेनेने ज्या पद्धतीने केला आहे, त्याची पोचपावती म्हणून गेली 30 वर्ष मुंबईकरांनी शिवसेनेला पसंती दिली आहे. यावेळेलाही मुंबईकर पुन्हा शिवसेनेवरच विश्वास दाखवतील, यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.


नारायण राणे सत्तेसाठी लाचार


मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्त्वाशी गद्दारी केली आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती. यावर विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. गद्दारीचा बिमोड करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. ज्यांनी बेईमानी केली त्यांना ठेचून काढणं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलं आहे. नारायण राणे यांनी सत्तेसाठी लाचार कसं व्हायचं हे संपूर्ण भारताला दाखवून दिलेलं आहे. स्वत:चा पक्ष स्थापन करुन त्याचं एक वर्षात विसर्जन करणारा नेता म्हणजे नारायण राणे. त्यामुळे नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाहीए, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.