कोलकाता: भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील ९ मतदारसंघांमधील निवडणूक प्रचाराचा कालावाधी २० तासांनी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून येथील प्रचार बंद होईल. येत्या १९ तारखेला याठिकाणी मतदान होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालच्या हिंसाचारात पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड झाल्याने निवडणूक आयोगाला अतीव दु:ख झाले आहे. हे कृत्य करणाऱ्या दोषींना लवकरच पकडले जाईल, अशी अपेक्षा आम्ही करतो. निवडणूक आयोग कदाचित पहिल्यांदाच कलम ३२४ चा अशाप्रकारे वापर करत असेल. मात्र, शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यामध्ये हिंसाचार किंवा कायद्याच्या उल्लंघनासारखे प्रकार घडल्यास याचा पुन्हा वापर होऊ शकतो, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



याशिवाय, निवडणूक आयोगाने रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराचा कोणताही व्हीडिओ सोशल मीडियावर टाकण्यास बंदी केली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या गृह सचिवांनाही त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. मुख्य सचिवांकडे या खात्याचा पदभार सोपवण्यात येणार आहे. 


कालच्या हिंसाचारानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली होती. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग निपक्षपातीपणे वागत नसल्याची तक्रार त्यांनी केली. तसेच तृणमूल काँग्रेसने केलेल्या हिंसाचाराविरोधात निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी अशी मागणीदेखील अमित शहा यांनी केली होती.