गुजरातमध्ये अवघ्या एका मतदारासाठी उभारले मतदान केंद्र
या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झालेय.
अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. केरळ आणि पश्चिम बंगालमधील हिंसक घटनांमुळे मतदानाला गालबोट लागले. मात्र, उर्वरित ठिकाणी तुरळक अपवाद वगळता सुरळीतपणे मतदान पार पडले. या सगळ्यात गुजरातमधील एक मतदान केंद्र चांगलेच चर्चेत राहिले. गुजरातच्या गीर अभयारण्यात फक्त एका मतदारासाठी हे केंद्र उभारण्यात आले होते. भरतदास बापू असे या मतदाराचे नाव आहे. जुनागढ क्षेत्रात येणाऱ्या गीर अभयरण्याच्या परिसरात ते राहतात. मात्र, या भागात त्यांच्याशिवाय अन्य कोणताही मतदार नाही. तरीही निवडणूक आयोगाने फक्त त्यांच्यासाठी गीर अभयारण्यात मतदान केंद्र उभारले. याबद्दल भरतदास बापू यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, सरकारने अवघ्या एका मतदारासाठी इतका पैसा खर्च केला. मी याठिकाणी मतदान केले. या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झालेय. अन्य ठिकाणीही लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, अशी प्रतिक्रिया भरतदास बापू यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्या टप्यासाठी ११६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण ६१.३१ टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्र राज्यात ५५.०५ टक्के मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाची सर्वाधिक म्हणजे ७८.९४ टक्के इतकी आकेडवारी नोंदवण्यात आली. त्यानंतर सर्वाधिक मतदान आसाममध्ये ७४.०५ टक्के त्याखालोखाल गोव्यामध्ये ७०,९६ टक्के मतदान झाले आहे. मुर्शीदाबाद येथील एका मतदान केंद्राजवळ काही अज्ञात लोकांनी हातबॉम्ब फेकल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नसले तरी मतदारांना घाबरवण्यासाठी हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.