IAS Pooja Khedkar News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर युपीएससीने कारवाई केल्यानंतर आता केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अजब गजब दावे केले होते. फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकरचं आयएएस पद गेलं होतं. एवढंच नाही तर युपीएससीने पूजा खेडकरवर गुन्हा देखील दाखल केला होता. अशातच आता केंद्र सरकारने सेवेतून बडतर्फ केल्याने पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम,१९५४ च्या १२ व्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आलेत. काही दिवसांपूर्वी यूपीएससीने तिची प्रशिक्षणार्थी IAS नियुक्ती रद्द केली आणि कायम स्वरुपी यूपीएससी परीक्षा देण्यावर बंदी घातली होती. 


बनावट अपंग प्रमाणपत्र


पूजा खेडकर यांनी अपंगत्व दाखवण्यासाठी दोन प्रमाणपत्रे सादर केली. तपासणीत त्यातील एक प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सांगितलं होतं. इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचे लाभ फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं मिळविल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे.


पूजा खेडकर यांच्यावरचे आरोप


पूजा खेडकरनं खोटं वैद्यकीय दिव्यांग प्रमाणपत्र दिलं? असा आरोप आहे. पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं होतं. UPSC ला फसवण्यासाठी पूजा खेडकरनं वारंवार नावं बदलली. केवळ पूजाच नाही, तर तिच्या आईवडिलांचीही नावं वारंवार बदलण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर आहे. पूजा खेडकरनं फ्रॉड केला, कौटुंबिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त असतानाही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केलं, असा आरोप तिच्यावर आहे. पूजा खेडकर यांचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी घटस्फोट घेतल्याचं सांगितलं गेलं. 


पूजा खेडकरनं निर्धारित संख्येपेक्षा अधिकवेळा UPSC परीक्षा दिली. IAS यादीत येण्यासाठी अपंगत्वाची श्रेणी बदलली, असाही आरोप तिच्यावर आहे. पूजा खेडकरांनी अनेकवेळा परीक्षा दिली, जे युपीएससीच्या नियमात बसत नाही. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर आणि तिच्या वडिलांनी अरेरावी केली. वरिष्ठ अधिकाऱ्याचं केबिन बेकायदेशीरपणे बळकावलं, असा आरोप केला जातोय.