बँक अकाउंटमध्ये पैसे नाहीत? असे काढता येतील 10 हजार रुपये, जाणून घ्या या खास खात्याबाबत
या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि ठेव रकमेवर व्याज मिळते.
Pradhan Mantri Jandhan Account: गेल्या काही वर्षात भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाचं बँकेत खातं आहे. केंद्र सरकारच्या जनधन योजनेमुळे शक्य झालं आहे. या खात्यांमुळे अनुदानाची रक्कम थेट बँकेत जमा केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत देशातील एकूण जनधन खात्यांची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली आहे. सरकारने या योजनेचा दुसरा टप्पा 2018 मध्ये अधिक वैशिष्ट्ये आणि फायद्यांसह लाँच केला आहे. असं असलं तरी काही जणांनी अजूनही पीएम जनधन खातं उघडलेलं नाही. जर तुमचं बँकेत खातं नसेल तर लवकरच पावलं उचला. कारण या खात्याची विशेष फायदे आहेत. तुम्हाला विशेष म्हणजे हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येते. यामध्ये तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज नाही.
जनधन खात्यामुळे झिरो बँक बॅलेन्स ठेवण्यासोबत काही सुविधा मिळतात. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि ठेव रकमेवर व्याज मिळते. जर तुमच्या खात्यात एक रुपयाही नसेल तर तुम्ही या खात्यातून 10 हजार रुपये काढू शकता. 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. त्याचबरोबर रुपे डेबिट कार्ड सुविधा मिळत असल्याने तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता किंवा स्वाइप करून खरेदी करू शकता.
जनधन खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्ससह KYC ची आवश्यकता पूर्ण करणारी कागदपत्रे सादर करावी लागतात. तुमच्याकडे कागदपत्रे नसल्यास, तुम्ही छोटे खाते उघडू शकता. यामध्ये तुम्हाला बँक अधिकाऱ्यासमोर स्वत:चे सेल्फ अटेस्टेड छायाचित्र आणि तुमची स्वाक्षरी द्यावी लागेल. जन धन खाते उघडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती हे खाते उघडू शकते.