गुरुग्राम : रायन इंटरनॅशनल स्कूल प्रद्युम्न हत्याकांडने आता नवे वळण घेतले असून सीबीआयने केलेल्या दाव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रद्युम्नची हत्या का करण्यात आली याचा खुलासा झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११वीच्या एका विद्यार्थ्याने प्रद्युम्नची हत्या केली असून त्याने परीक्षा टाळण्यासाठी असे केल्याचे सांगितले. सीबीआयच्या चौकशीतून समोर आले की, आरोपीने अनेक दिवस परीक्षा टाळण्याचे पर्याय शोधले. त्यानंतर त्याला हत्येशिवाय दुसरा मार्ग सापडला नाही. त्याला वाटत होते की, काहीतरी मोठं झाल्याशिवाय शाळा बंद होणार नाही. 


सीबीआयने हरियाणा पोलिसांनी मुख्य आरोपी केलेल्या कंडक्टर अशोक कुमारला क्लीन चीट दिली आहे. हरियाणा पोलिसांनी दावा केलाय की, लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कंडक्टरने प्रद्यम्नची हत्या केली. पण सीबीआयला आपल्या तपासात त्याच्या विरोधात काहीच मिळाले नाही.  


चौकशी दरम्यान आरोपी विद्यार्थ्याने सीबीआयला सांगितले की, ‘मला काही समजलं नाही. मी पूर्णपणे ब्लॅंक झालो होतो आणि बस मी त्या त्याला मारले’. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी ११वीची सहामाही परीक्षा सुरू होती. ६ सप्टेंबरला आरोपीने पहिला पेपर दिला. आणि ८ सप्टेंबरला म्हणजे हत्येच्या दिवशी त्याला दुसरा पेपर द्यायचा होता. चौकशी दरम्यान सीबीआयला त्याच्या हालचालींवर संशय आला. त्यावरून समोर आले की, आरोपीला क्लासमेट्ससोबत हे बोलताना ऎकण्यात आले की, तो परीक्षा रद्द करेल. त्यानंतर सीबीआयने या दृष्टीने तपास केला.